आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे
इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे,
ती जाणून
घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.
"भारत माझा देश
आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..."
आपण रोज नित्यनियमाने
शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा
विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी.
परंतु एवढ्यावरच थांबून
चालेल काय? आज आपल्या भारत
देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची.
आपण समाजात पाहतो गरिब
व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित,
तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना.
प्रत्येक व्यक्ती आज मी
व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून
मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो.
शाळेत येणाऱ्या
प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे,
त्यालाही मन, भावना
आहेत, त्याचेही विचारांचे विश्व असते. हे समजून घेऊन त्या विद्यार्थ्यांना
घडविण्यासाठी मूल्यसंस्काराची गरज आहे.
एखादे मूल शाळेत गप्प
का असते? रोज उशिरा का येते? शांतच का बसते? मस्तीच का करते?
रागावते का? अबोला का धरते? अभ्यास
न करण्याचे कारण, उद्धट असण्याचे कारण, असुरक्षित वाटण्याचे कारण अशा आणि बऱ्याच का?
ची उत्तरे शोधायची असतील तर मूल्यसंवर्धन या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज
आहे.
विद्यार्थ्यांसाठी काही
वर्ग नियम तयार करता येतात जसे की शाळेत वेळेवर येणे, स्वतःबरोबर इतरांचा विचारांचाही आदर करणे, एकमेकांना
सहकार्य करणे वगैरे आणि हे वर्ग
नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक शिक्षा उदा. झाडांना पाणी शिंपणे, फळ्यावर सुविचार लिहिणे, मध्यान्ह भोजन वाढताना
मुलांच्या रांगा करणे वगैरे देऊन आपण विद्यार्थ्यांवर मूल्यांचे संस्कार करू शकतो.
स्त्री -पुरुष समानता
हे मूल्य शालेय जीवनात रुजवणे ही तर काळाची फार मोठी गरज आहे. यासाठी होऊन गेलेल्या
आणि सध्या कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कार्याचा
परिचय करून देणे, शाळा पातळीवर मुलगा-मुलगी असा भेद न करणे,
सर्व कामांची विभागणी
समान पातळीवर करणे, दोघांनाही समान स्थान व दर्जा देणे या गोष्टी घडल्या तर
स्त्रियांविषयी आदर, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात बदल करणे शक्य होईल.
इतरांना समजून न
घेण्याची, मनाविरुद्ध
गोष्टी घडल्या कि स्वतःवर नियंत्रण न ठेवता समाजास नुकसान करणाऱ्या घटना करण्याची
वृत्तीही या समाजात मूळ धरते आहे. या वृत्तीस आळा घालावयाचा असेल तर
विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर मूल्यांच्या बीजाचे रोपण करणे क्रमप्राप्त ठरेल.
आपले मत कोणी ऐकले नाही
की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात,
त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या
भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.
काळाची गरज असणाऱ्या
मूल्यांचा होत असलेला ऱ्हास आणि मूल्यसंवर्धनाची गरज लक्षात घेऊनच मूल्यवर्धक उपक्रम शाळापातळीवर
अवलंबून देशाची भावी पिढी मूल्यसंस्कारयुक्त बनवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तेव्हाच "देश
प्रगतिपथावर राहील व देशाचा संस्कारक्षम विकास होईल".
जि. प. शाळा
आगवन नवासाखरा
केंद्र सावटे, ता. डहाणू
जि. पालघर