प्रशांत रामभाऊ सुसर, बुलडाणा
मराठी
आपली मातृभाषा,
मायबोली. त्यामुळे इंग्रजी ही सावत्र आईच म्हटली पाहिजे. त्यामुळे
ती आपलीशी होतच नाही. 'साहेब' आपल्याला
सोडून जायला आता सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालीत, मात्र
जाताना ते इंग्रजीचं भूत मागे सोडून गेलेत. ते आपल्या बोकांडी बसलं ते कायमचंच. आज
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जगाची भाषा आहे. म्हणून तिला 'Window to the
world' म्हणतात. कितीही नावं ठेवली, टाळतो
म्हटलं तरी आता आपण तिला टाळू शकत नाही.
पण
मग ती शिकताना शिकवताना आपण आपल्याच पद्धतीने कशी शिकतो तिच तर खरी
गंमत आहे. मागे 'इंग्लिश-विंग्लिश' नावाचा एक सुंदर चित्रपट आला
होता. त्यात इंग्रजी येत नसल्यामुळे नायिकेला कसा अपमान सहन करावा लागतो आणि
त्यातून ती कसा मार्ग काढते हे सुंदररित्या दाखवले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही
इंग्रजी भाषा ही आता अविभाज्य भाग बनली आहे. प्रत्येक वाक्यागणिक एखादा इंग्रजी
शब्द उच्चारला जातोच. या इंग्रजाळलेल्या भाषेमुळे अनेकदा हास्यास्पद परिस्थिती
निर्माण होते. मात्र इंग्रजी ही इम्प्रेशन मारण्याची भाषा असल्यामुळे आपल्याला ते
अंगवळणी पडले आहे. फाडफाड इंग्लिश च्या नादात आम्ही तिची चिरफाड च करतो. स्पेलिंग
आणि उच्चार यांचा काटेकोर सहसंबंध नसल्यामुळेही बऱ्याचदा इंग्रजीचं खोबरं केलं
जातं. Should, would, could यातला 'L' सायलेंट
आहे मात्र नवशिके यांचा उच्चार शूल्ड, वुल्ड, कुल्ड असा करतात. दोन वर्ग मित्र भेटल्यावर इतरांना ओळख करून देतांना
हमखास हा माझा क्लासमेंट (classmate) आहे असं आवर्जून
सांगतात. Salient features ला सायलेंट फीचर म्हणणारे आमचे एक
प्राध्यापक आपली चूक सायलेंटली कधीच मान्य करत नव्हते तेव्हा
आमचं फ्युचर खराब होणार हे आम्हाला कळलं होतं. तेव्हाच characteristics
la कॅरेक्टर स्टिक्स म्हणणारा आमचा वर्गमित्र मात्र माझंच खरं असं
ठासून सांगायचा. इंग्रजी ही परकीय भाषा आहे आणि ते त्यांच्या परंपरा जपतात.
त्यामुळे शब्दांचे उच्चार जरी बदलले तरी स्पेलिंग मात्र कायम राहतात. Psychology सायकोलॉजी त P कशासाठी ठेवला असेल हे तेच जानो बापडे. म्हणूनच आपले बच्चनजी प्रश्न
विचारतात की, do डू होतं, to च टू होतं
तर मग go चं.. का होत नाही.? पण lier आणि lawyer यात जशी पुसट सीमारेषा आहे तसेच इंग्रजी भाषेतही आहे. My name
is... आणि May I come in sir. (खेड्यात माय कमीन सर) यांच्या पलीकडचं इंग्रजी आपण कधी शिकतच नाही.
इंग्रजी येत नसलं तरी इंग्रजी बोलायची मात्र आपल्याला भारी हौस (house नाही) असते त्यामुळे केसांची हेअर स्टाईल करून शर्ट ची win करून आपल्याला इंग्रजीवर win
मिळवल्यासारखं वाटतं. दिवटीवर (ड्युटी) जाताना आपण बसमध्ये 'अप-डाऊन'(commute) करत असतो आणि 'एका' 'लेडीज' ला जागा देऊन
स्टँडिंग मध्ये उभा राहून प्रवास करतो. इंग्लिश मीडियम मला शिकूनही आम्ही नुसते parrot
बनतो कारण गाजराचा carrot की क्रेट (cret) यातला फरक आम्हाला
अजूनही कळत नाही. आमचं इंग्रजी बेसिक कच्चं असलं तरी आम्ही 'बेसिंग'
मध्ये हात धुतो आणि 'हँडकरचीफ' ला फेसवाश
करतो.
आजारपणात आम्हाला 'विकनेसपणा' येतो. मग आम्ही डॉक्टरकडून विंजेक्शन
घेतो. स्कूल ला आम्ही इस्कूल म्हणतो (डिजिटल नसली तरी) ड्रायव्हर सोबतच्या माणसाला
आम्ही किन्नर (क्लिनर) करून टाकतो. आम्ही
सायकलची ओरायलिंग (overhauling) करतो. फोटो काढताना आम्हाला
पाठीमागचा बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे असतं. आम्ही रात्रीची नाईट ड्युटी करतो. 'इलेक्शन ड्युटी' आम्हाला 'विलक्षण
दिवटी' वाटते. Pull
आणि push मधला फरक आम्हाला शेवटपर्यंत
कळत नाही. किचन आणि कि चेन मधला फरक आम्हाला समजत नाही. पण इंग्रजी बोलल्याशिवाय
आम्हाला चैन पडत नाही. Wedding Anniversary ला आम्ही marriage
anniversary म्हणतो. शब्दांचे योग्य welding न
केल्यामुळे बरेच accident होतात. फेसबुक वर happy
moment ऐवजी happy
movement पाहून तर इंग्रज Quit India movement ला घाबरून पळाले ते बरं झालं असं
वाटतं.
गेल्या वर्षी काहींनी कोरोना ला पण 'करूणा'
करून टाकलं होतं तेव्हा मला त्यांच्या इंग्रजीची 'करुणा' वाटायला लागली.
इंग्रजी भाषा शिकायची असेल तर थोडा awerness अवेअरनेस म्हणजे जागरुकता अधिकाधिक सराव आणि थोडा व्याकरणाचा अभ्यास या गोष्टी आवश्यक आहेत. अन्यथा इतरांना डिस्टॉप (डिस्टर्ब) न करता इंग्रजी बोलण्याची रिक्स(risk) न घेतलेलीच बरी..…!