मुख्य सामग्रीवर वगळा

माझा यशस्वी विद्यार्थी

 


शिक्षण सेवेत सन 2000 पासून आज 20 वर्ष पूर्ण झाली. 20 पिढ्यांच भविष्य प्रामाणिकपणे घडविलं याचा सार्थ अभिमान वाटतोच. का वाटू नये, जो स्वत:चं कार्य स्वत:च्या नजरेत उत्तम पाहतो त्याच्या कार्याचा प्रामाणिक प्रयत्न समाजाच्या नजरेत कौतुकास पाञ ठरतो. मी या लेखातून एक प्रांजळ मत मांडू इच्छिते की, लोकांच्या नजरेत राहण्यापेक्षा स्वत:च्या नजरेत उत्कृष्ट बनावं.

संस्कार व मूल्यवर्धनातून आजपर्यंत कित्येक विद्यार्थी घडवित गेले, घडवितही आहे. मग त्या लिस्टमध्ये लक्ष्मी कोनापूरे, अश्विनी कोनापूरे, राहूल थंब, गौरीशंकर कोनापूरे, सिध्दू, वंदना, समीर, सोनाली, राधिका असो नाहीतर आत्ताचा शुभम, राही व गुरू असो, प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या कौतुकपूर्ण गुणवत्ता व हुशारीतून पटकन लक्षात येतो. पण... आज 1999 साल सप्टेंबर महिना आठवतोय.

1997-1999 असा डी. एड. शैक्षणिक प्रवास संपवून मी बार्शी हून घरी परतले. घरात वडिलांसोबत राजर्षि शाहू महराज प्राथमिक शाळेचे संस्थापक श्री. अनिल वाघमारे, वडिलांचे मिञ, वडिलांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यांच्याशी वडिलांनी माझी ओळख करून दिली, तेव्हा अनुभव असावा म्हणून मला दूसऱ्या दिवशीच शाळेत येण्यास त्यांनी सांगितले. डी. एड. मध्ये पाठ घेण्यापर्यंत ठिक होतं, पण आज प्रथमच एक अख्खा वर्ग शिकविण्यासाठी माझ्या ताब्यात देण्यात आला. निरागस चेहरे, हसरी फुलं मी आनंदाने त्यांच्याकडे पाहिलं. हजेरी उघडली इ. तिसरी. सर्व मुलांची हजेरी घेतली... कृष्णा अंबण्णा फुलारी... टीचर तो कधीच शाळेला येत नाही, रडतो.

पहिला दिवस आनंदात गेला, पण घरी आले तरी कृष्णा चक्र मनात घोळतच होते. दूसऱ्या दिवशी शाळेला 9 वाजताच गेले. तेव्हा माझी लेडीज सायकल... सायकलवरच साडी नेसून शाळेला ऐटीत जायचं. एका मुलाला सोबत घेवून कित्येक गल्ली- बोळ पार करत कृष्णाचं घर गाठलं.

  कृष्णाचे आई-वडील सकाळी मोलमजूरीस जाण्याच्या गडबडीत... नमस्ते... मी कृष्णाची बाई... तो शाळेत का नाही येत ? अहो, बाई कितीही मारलं तरी दिवसभर इथच फिरतय, आम्ही काम करून पोटाचं बघाव, का याच्या मागच फिराव, असं आई म्हणते ना म्हणते तोपर्यंत कृष्णा हे धूम पळाला... कृष्णा, कृष्णा... म्हणत सायकलवर मी ही त्याच्या पाठीमागे,.. तब्बल अर्धा तासानंतर कृष्णाला पकडला, शाळा नको म्हणणाऱ्या, पाय झाडणाऱ्या, कृष्णाला चांगलाच चोप देवून सायकलवर बसवून शाळेत आणला. तिसरीत असणारा कृष्णा नवागत विद्यार्थी असल्यागत सर्व विद्यार्थी त्याच्याकडे पाहू लागले. अख्खा परिपाठ होईपर्यंत तो माझ्या तावडीत माझ्या समोरच...

शाळा भरली, हजेरी घेतली, आज कृष्णा मारून मुटकून जबरदस्तीने शाळेत... हजर... दिवसभर शाळेतील अभ्यास, खेळ यात तो वघडल्या सारखा झाला. मी ही त्याची मानसिकता ओळखून प्रेमळपणानेच घेतले व शाळा सुटताना मी उद्या परत तुला घ्यायला येणार, असं धमकीवजा बजावलं. मग काय, नित्याचा दिनक्रमच झाला... शाळेत जाणे, कृष्णाच्या घरी जाऊन त्याला सायकलवर आणणे... शाळेत बसविणे. थोडा थोडा कृष्णा रूळत होता, शाळेतील छोटी छोटी कामे मी त्यालाच सांगायची. पंधरा दिवसानंतर काय आश्चर्य...माझ्या आधी कृष्णा शाळेत हजर, माझ्या प्रामाणिक सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश मिळालेलं. कृष्णाच्या आईने आनंदाश्रु काढत, बाई, लेकराला शाळेची गोडी लागली. लय हुशार हाय, पण शाळेत येत नव्हता, मला वाटलं याला पण मोलमजूरीच करावं लागतयं का? पण आता तो दररोज येईल शाळेला असं आई म्हणते नं म्हणते तोच कृष्णाने लगेच हसत होकारार्थी मान डोलविली.

एप्रिल पर्यंत नियमित न चुकता शाळेत येवून कृष्णाने 1 मेला निकालही नेला... पण 17 जून 2000 ला मला जिल्हा परिषद मराठी शाळा, नागणसूर येथे सरकारी शाळेत नोकरी लागली. मी शाळेत रूजू झाले. पुन्हा काही फोन नाही ना भेट नाही मी ही जि. प. शाळेत रमले... पण परवा नोव्हेंबर,2019 महिन्यात माझी किरकोळ रजा, मी घरात असताना मला एक फोन आला, मी फोन उचलताच, मँडम, मी तुमचा कृष्णा, आठवलं का...? माझ्या स्मृतीपटलावर कृष्णा पुसट झाला होता पण... तुम्ही मारून मारून सायरलवर शाळेत आणला होतात मला आठवतय का? असं म्हणताच तो कृष्णा मला आठवला, मँडम, फेसबुक वर तुमचे उपक्रम, तुमचे अजूनही तेच प्रामाणिक काम पाहून मी तुम्हाला शोधत तुमच्या शाळेत आलो तुम्हांला भेटायला, असं म्हणताच माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले, तिकडे फोनवर माझा कृष्णाही रडत होता... बाळा, मी फक्त सहा महिनेच तुला शिकवलं, पुढं तुझी माझी भेटही नाही, मी तुला खूप मारलं, तरी तु मला शोधत आलास? यावर कृष्णानं दिलेलं उत्तर, "मँडम, मी सोलापूरलाच राहतो, इंडस्ट्रियल एरिया, होटगी रोड, सोलापूर येथे 'भाग्यश्री इंजिनिअरिंग वर्क्स' माझं स्वत:चं आहे. माझं 2014 पासून स्वत:चं वर्कशॉप आहे, माझ्याकडे 10 वर्कर्स काम करतात. मँडम, हे फक्त तुमच्यामुळे झालयं. तुम्ही जरी मला फक्त सहा महिनेच शिकवल असलं तरी तुम्ही मला मारून मारून शाळेची गोडी लावलीत त्यामुळे मी शाळेत टिकलो व शिकलोही, खरंच मँडम, छडी लागे छमछम.... हेच बरोबर आहे. मला तुम्हांला भेटायचय, मी आज यशस्वी आहे तुमच्यामुळेच व माणूसही बनलो तुमच्यामळेच..... अशी स्तुतीसुमने माझा कृष्णा मला देत होता आणि या माझ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनोमन मी कौतुक करत होते. मला वाटलं विद्यार्थ्यांना आजकाल शिक्षा करणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही होते, मग या शिक्षेमुळेच मी यशस्वी झालो, असं माझा विद्यार्थी आज 20 वर्षानंतरही म्हणतोय. खरंच कृष्णा तुझा एक यशस्वी विद्यार्थी म्हणून मला सार्थ अभिमान आहे म्हणूनच हा लेख मी अभिमानाने तुझ्यावरच लिहिला..


सुवर्णा बोरगांवकर

जि. प. प्रा. मराठी शाळा,

कर्जाळ ता. अक्कलकोट

जि. सोलापूर 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....