श्रीमती. सविता दिलीप वाघूळदे
जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर ओझर खुर्द,
ता.जामनेर,
जि. जळगांव
मला
सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं... ह्या सुंदर ओळी कधीच न ऐकलेली किंवा कधीच न
गुणगुणलेली व्यक्ती मिळणं तसं दुर्मिळच!!! "सुख" या वलयाभोवती सारं
विश्व घिरट्या घालतंय अगदी अनंत काळापासून...किती आटापिटा, किती
ते प्रयत्न, किती ती स्पर्धा...एवढं सगळं करून ही कुणाला
गवसलंय का हे सुखं...? अनुत्तरित प्रश्न, जो भेडसावतोय प्रत्येकाला, तसाच मलाही, सुखाची तशी विशिष्ट व्याख्या असूच शकत नाही, कारण
सुख मानण्याची ज्याची त्याची मापदंड वेगळी.
माझ्यासाठी ह्या सुखाची व्याख्या नेमकी
काय! असा प्रश्न मला जेव्हा जेव्हा पडतो, तेव्हा तेव्हा भरभरून उत्तरं मनात
पिंगा घालतात....निरभ्र आकाश, स्वच्छ उजाडलेला दिवस, मंद वाऱ्याची झुळूक हे ही सुखच माझ्यासाठी, पक्ष्यांची
मंजुळ किलबिल कानावर येणं, घरकाम करतांना आवडीची भावगीतं,
चित्रपट गीतं ऐकणं, मेहनतीने केलेला स्वयंपाक,
त्याचा घरातील सर्वांनी कौतुक करून आस्वाद घेणं, दिवसभरातील घरकामांमधून स्वतःसाठी थोडा का होईना वेळ मिळणं... अहाहा!!! हे
सुख नाही तर आणखी काय....!
माझ्या बाळाचे गोड शब्द कानी ऐकू येत
अख्खा दिवस अगदी आनंदात जाणं, त्याच्या लडीवाळात दिवस-रात्र न्हाऊन निघणं,
हे सुखच!!! सुखाच्या
परिसीमा आपण विस्तीर्ण करून ठेवल्या की मग त्या सुखासाठी फक्त झुरणं आपल्या हाती
असतं, म्हणून छोट्या छोट्या, सहज वाटणाऱ्या, मनाला अमर्याद आनंद देऊन जाणाऱ्या गोष्टींमध्ये सुख मानलं ना तर तेच सुख
आपल्या पायाशी लोळण घालत...बघा अनुभवून....घ्या शोध ह्या "सुखाच्या सरींचा" आणि
भिजून जा, त्या सरींमध्ये, चिंब चिंब, नखशिखान्त...!