प्रशांत रामभाऊ सुसर, बुलडाणा
'दिनूचे बिल' नावाचा एक पाठ शाळेत असताना आम्हाला
अभ्यासाला होता. दिनूला त्याची आई घरातील छोटीमोठी कामे सांगते. ती कामे तो करतो.
मात्र एक दिवस त्या सर्व कामांचे एक बिल तयार करून आईला देतो. आई ते बिल पाहते.
तिला वाईट वाटते मात्र ती दिनूला काहीच न बोलता एक बिल तयार करून झोपलेल्या
दिनाच्या उशाशी ठेवते. त्यात दिनूच्या आंघोळी पासून तर आजारपणापर्यंत प्रत्येक
कामाची यादी असते. मात्र बिल म्हणून शून्य रुपये दिलेले असतात.ते बिल पाहून दिनूला
आपली चूक कळते व तो आईला जाऊन बिलगतो.
आपण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे आभार मानतो. तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो. परंतु आजही समाजात अनेक लाडावलेल्या बबड्यांना 'आई कुठे काय करते' असेच वाटत असते. 'मदर्स डे' च्या निमित्ताने आपण सोशल मीडियावर ढीगभर शुभेच्छा देणार. मात्र आपल्या कपड्यांचा ढीग मात्र आईलाच धुवावा लागणार. जी नऊ महिने आपल्याला पोटात वागवते तिची महती सांगावी तरी किती...? सुमित्रानंदन पंत म्हणतात 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' अर्थात माता आणि जन्मभूमी यांचे स्थान स्वर्गाहुनी श्रेष्ठ होय. 'आई' हा दोन अक्षरी शब्द पण त्यातच सारे विश्व सामावलेले आहे. आई, माय, माता, माऊली, जननी हे शब्द म्हणजे स्वतंत्र शब्दकोशच.
'लिंबोणीच्या झाडामागे चंद्र
झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही' असं
हळुवार अंगाईगीत गाऊन बाळाला निजवणाऱ्या आईला बघूनच माया, प्रेम,
वात्सल्य, ममता, करुणा,
या शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. असं म्हणतात की ईश्वर सर्व ठिकाणी
पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. म्हणूनच 'ये
तो सच है कि भगवान है,
है
मगर फिर भी अंजान है,
धरती पे रूप मा बाप का उस
विधाता की पहचान है।'
या गाण्याच्या ओळी सार्थ ठरतात. 'आई म्हणजे
प्रथम गुरु'. जीवनाच्या शाळेत आत्मविश्वासाने पहिलं पाऊल
टाकायला तीच शिकवते. बोट धरून चालायला
शिकवते ती आई. घास भरवायला आपल्या मागे धावते
ती आई.
आपलं
हसणं, रडणं, दुखणं,खुपणं, खेळनं, बागडनं, रागावणं,
रुसणं सारं काही आनंदानं करते ती आपली आई. म्हणुनच रामाला वनवासाला पाठवूनही
कैकयी रामाला वंदनीय राहिली. देवकीने जन्म
दिला असता तरी कृष्णाला जीवापाड जपणारी यशोदा माता म्हणून श्रेष्ठ ठरली. माँ जिजाऊ
होत्या म्हणून शिवबा घडले. किरण बेदी फक्त आपल्या आईला भेटण्यासाठी दुपारच्या
सुट्टीत शाळेतून घरी पाच किलोमीटर धावत येत. उत्तम कांबळेंची 'आक्का' अडाणी
असली तरी 'आई समजून घेताना' मध्ये खूप
काही सांगून जाते.
कविवर्य स. ग. पाचपोळ आपल्या वऱ्हाडी बोलीत
मायचं गुणगान करताना म्हणतात "हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय".
हे 'आईपण' फक्त
मनुष्यप्राण्यातच नव्हे तर साऱ्या प्राणीमात्रात रुजलेलं आहे.
म्हणूनच संत जनाई म्हणतात,
पक्षी
जाय दिगंतरा बाळकांसी आणि चारा
घार
हिंडते आकाशी झाप घाली पिलांपासी
माता
गुंतलि कामासी
चित्त तिचे बाळापाशी
वानर
हिंडे झाडावरी
पिला बांधूनी उदरी ।। दवाखान्यात बाळाचा जन्म झाल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा झाला की मुलगी फक्त आईच विचारते माझं बाळ कसं आहे..? म्हणूनच ती आई असते. आईची महती वर्णन करताना कवी यशवंत म्हणतात
चारा
मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठ्यात
वासरांना या चाटतात गाई
आई
असताना तिचं अस्तित्व जाणवत नाही मात्र ती गेल्यावर ही उणीव भासत राहते म्हणूनच
कवी म्हणतात
ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी
तिन्ही जगाचा आईविना भिकारी
घरात
कितीही लोक असू द्या पण आई नसेल तर घर खायला उठतं.
आईचं प्रेम समुद्रासारखा असतं तुम्ही त्याची
सुरुवात पाहू शकता,
शेवट नाही. म्हणूनच व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं
प्रेम म्हणजे मातृत्व. कवी फ. मु. शिंदे म्हणतात, आई खरंच
काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची
गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची
माय असते, आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही
आणि
उरतही नाही. लहानपणी आम्हाला आमच्या आईचा खूप धाक होता. तिची शिस्त कडक होती. काही चुकलं तर ती रागवायची.
प्रसंगी मारही पडायचा पण त्यामुळेच आम्ही 'बि'घडलो नाही
तर घडलो. म्हणूनच म्हणावेसे वाटते 'आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवनाला आकार'. आईचे उपकार कोणाकडूनही या जन्मात फिटने शक्य
नाही. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. म्हणूनच मातृदेवो भव, पितृदेवो भव
असं शास्त्रांत सांगून ठेवलंय.
आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. देव दिसला आई मज तुझ्या अंतरात
मग सांग का जाऊ मी मंदिरात. आई हेच माझं दैवत. पण तिला केवळ देवत्व बहाल करून
भागणार नाही. माणूस म्हणून तिच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे.
आज पर्यंत सगळ्यात
जास्त लिहिलं गेलंय ते आईवरच. परंतु तरीही ते कमीच आहे कारण तिची थोरवी अगाध, अनंत आहे.
आईची महती वर्णावी एवढी कुवत माझ्यासारख्या पामराची नाही.
म्हणूनच म्हणतात, आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई तरी आईचा
महिमा लिहिता येणार नाही.
आपल्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या, घरासाठी ३६५ दिवस आजीवन राबणाऱ्या आईला जर आपण 'आई कुठे काय करते' असं म्हणत असू तर आपण कुठेतरी चुकत आहोत....