सौ. भारती सावंत, मुंबई
किती गाऊ बाप्पा आज
मी गोडवे तुझ्या महतीचे
प्रतिक्षा तुझ्या आगमनाची
मिळते पहाया दर्शन भक्तीचे
आमच्या
बालपणी तुम्ही असेच थाटात,
ढोल-ताशांच्या निनादात वाजत-गाजत यायचात. बाबा गणपती बाप्पाला
बसवलेला पाट डोईवर घेत. आम्ही सारी मुले टाळ्यांचा गजर करत बाबांच्या पाठोपाठ चालत
असू. नदी किनार्या वरून मिरवणूक काढून बाप्पा तुम्हाला घरापर्यंत आणले जाई.
घरातील सुवासिनी तुमचे आणि बाबांचे पंचामृताने पाय धुऊन हळदी-कुंकू लावून, पायावर स्वस्तिक काढून जल्लोषात तुम्हाला घरात आणत आणि रंगरंगोटी, सजावट केलेल्या पाटावर तुम्हाला स्थानापन्न करत. फुलांच्या वर्षावात 'गणपती बाप्पा मोरया'
करून आरोळी देत स्वागत करायचो. त्यावेळी आम्हा बालकांना खूप आनंद
व्हायचा. पूर्ण अकरा दिवस भक्तिमय वातावरण नि तुमच्या जवळच आमचा मुक्काम.त्यामुळे
ते अकरा दिवस अभ्यासाला पूर्ण सुट्टी. गणपतीची कामे दूर्वा, हराळी
आणायला रोज रानात जायचं. एकवीस दुर्वांची जुडी तुमच्या पायाशी ठेवायची. पेढ्या,
मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. किती छान असायचे ते सारे! टाळ घंटी वाजवत
रोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हणायचं. धूप-दीप, अगरबत्ती
यांच्या दरवळाने घरातील वातावरण मंगलमय पावित्र्याने भारलेले असे. आम्ही मुले तरी
तुमच्या बाजूलाच बसून राहायचो. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या हातावर प्रसाद आणि
मिठाई ठेवण्यासाठी आमची नेमणूक केलेली असे.
घरातील सर्व स्त्रिया रोज नव्या साड्या
आभूषणांनी सजत. त्यामुळे घरात रोजच सोहळ्याचे वातावरण असे. मुलांना नवीन कपडे मिळत. तसेच रोज गोडाधोडाच्या
पक्वान्नांनी घरात गोड वास दरवळत राही. धूप,
अगरबत्ती
आणि कापुराच्या वासाने वातावरणातील प्रसन्नपणा मनाला मोहून टाकत असे. आजार नि
पथ्थे नसल्याने सर्वजण घरात बनवलेले सारे पदार्थ मोठ्या आनंदाने चाखत. सुगरणीच्या
पदार्थांची वाखाणणी करत. सुगरणीही सारे पदार्थ मोठ्या निगुतीने बनवत. बाप्पाला
नैवेद्य दाखवून झाले की आमची पोटपूजा होई. पंगतीच्या पंगती जेवून उठत. खूप मजा
यायची.
गणपतीच्या अकरा दिवसात रोज घरात आणि गावातही सायंकाळपासून दशावतारी नाटुकली आणि कीर्तन, भजन,
देवांची गाणी अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. त्यामुळे
घरातील, गावातील सर्वजण संध्याकाळपासून ग्रामस्थ मंदिराच्या
समोरील पटांगणात हजेरी लावत असू. जागा पकडून ठेवण्यासाठी आम्ही मुले तिथेच मुक्काम
ठोकायचो. अकरा दिवस गणपतीच्या भक्तिमय वातावरणात सगळीकडे आनंदाचे वातावरण असे.
तुझ्या आगमनानंतर गौरी ही माहेरी येत. त्यांच्या माहेरवासात त्यांना अनेक पदार्थ
खाऊ घातले जात. जागरणही व्हायचे. घरातील सुवासिनी, मुली,
वयस्कर बायका गौरीची, पंचमीची गाणी म्हणून
रात्र जागवत, पंचमीला फुगड्या, झिम्मा
अनेक खेळ खेळले जात. पाचव्या दिवशी गौरी विसर्जन होई. काही घरांतील गणपतीचेही गौरी
सोबत विसर्जन होई. पण बऱ्याच घरात अकराव्या दिवशी शिरा, भडंग,
चिवडा, पेढे असा नैवद्य दाखवून टाळ घंटीच्या
तालात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
वर्षी लवकर या' अशा आरोळ्यात गावातील नदी किंवा विहिरीत तुझे
विसर्जन व्हायचे. तेव्हा जीव गलबलून यायचा.
हल्ली काळ बदलला, पिढी
बदलली. नवीन तंत्रज्ञान आले. टाळ घंटीची जागा बँजो, डीजे
यांनी घेतली. बाप्पांचे आकारही वाढले. 'एक गाव एक गणपती'
ची संकल्पना ही मागे पडली नि गल्लीगल्लीत गणेश मंडळाचा सुळसुळाट
झाला. प्रत्येक जण आपला बाप्पा आकाराने मोठा नि जास्त सजवलेला असावा या कल्पनेने
गणपती मोठा आणू लागले. वर्गण्या गोळा करून बाप्पाचे आगमन टणाटण, ढणा ढण आवाजात पन्नास पन्नास मुले, माणसे समोर नाचत
दिवसभराचा वेळ घेऊन गणपतीचे आगामन आणि विसर्जन होते. यात माणुसकीचा कुठेच लवलेश
नसतो. घरातील वृद्ध, आजारी लोकांना या
आवाजाचा
किती त्रास होतो याचा विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली. आपल्या मंडळाच्या बेंजोचा आवाज वाढवून जास्त जाहिरात होते अशी
संकल्पना आली याचाच दुष्परिणाम म्हणून ध्वनी प्रदूषणाने अतिरिक्त पातळी गाठली.
रात्री धांगड धिंगाणा घालण्यात हे
कार्यकर्ते राहू लागले. शेवटच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करताना पोलीस, राखीव दल,
होमगार्ड, सार्वजनिक कार्यकर्ते, गाडी चालक या सर्वांच्या नाकीनऊ येते. घरातील, मंडळातील,
सोसायटीमधील मिळून गणपतींची संख्या कोटींच्या घरात जाते. त्यांचे
विसर्जन कुठे नि कसे करावे हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय नऊ दिवस जागरण नि
आरतीच्या नावाखाली खूप ठिकाणी खंडणी प्रमाणे वर्गणी उकळली जाते. अक्षरशः लोकांना
लुटले जाते. दहा दिवसाच्या कार्यक्रमासाठी जागरण करून अश्लिल, टपोरी वागण्याला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे मूळ हेतू बाजूला राहतो
आणि गणेशोत्सव असावा की नसावा असा प्रश्न पडतो. लोकांमधील भक्तिमय वातावरण संपून
स्पर्धा दिसु लागली. कर्णकर्कश आवाजात अकरा दिवस गणपतीपुढे लाऊड स्पीकर लावला
जातो.
लोकांच्या या अशा वृत्तीमुळे
बाप्पा आता तुमचे आगमनही नकोसे वाटू लागले आहे. तुम्ही येणार म्हटले की
अंगावर काटा येतो. चंगळवाद वाढल्याने युवापिढी ही भरकटली आहे. गणपती असलेल्या अकरा
दिवस काम धाम न करता ही रिकामटेकडी टवाळ पोरे तुमच्याजवळ येऊन बसतात नि नको ते
अंगविक्षेप, अश्लिल बोलणे बोलून वातावरणातील पावित्र्य ही कमी करतात. रात्री भक्तांची
गर्दी कमी झाली की यांच्या जुगार आणि व्यसनी वृत्तीला चालना मिळते आणि गणपती
बाप्पा तुमच्या पुढे बसून त्यांचे सर्व गैरव्यवहार चालू होतात. गणपतीच्या काळात
आपला खिसा किती गरम होईल असाच दृष्टिकोन दिसून येतो. त्यामुळे बाप्पा आता तुझे
आगमन मंगलमय न वाटता जाचक वाटू लागले आहे. या कृत्याला
वेळीच
आळा घालणं आवश्यक आहे. टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला तो मागे पडून
आता त्या पवित्र सोहळ्याला बाजारी स्वरूप येवू पहात आहे. सण सोहळ्याची महती कमी
होऊन ओंगळपणा वाढत आहे.