संतोष बा. मनसुटे
जि. प. शाळा रुधाना
जि. बुलढाणा
५
सप्टेंबर चा दिवस उजाडला. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्थरावरिल
आदर्श शिक्षकांची नावे जाहीर झाली. आदर्श शिक्षक पुरस्कार हा आपले पुढल्या महिन्यात
सेवानिवृत्त होत असलेले विठ्ठल सर यांना मिळावा अशी आंतरिक ईच्छा स्टाफ च्या सर्व
शिक्षकांना वाटत होती.पण मला पुरस्कार मिळावा या करिता चढाओढ करावी, आणि मी कसा
आदर्श आहे हे वरिष्ठांना पटवुन द्यावं आणि संभवता वशिलेबाजी करावी, हा विचार सरांच्या तत्वात बसत नव्हता.
तेवढ्यात विठ्ठल सर आपल्या दुचाकी फटफटीने
शाळेच्या आवारात दाखल झाले. फट फट फटऽऽऽ करित सरांची गाडी थांबली, तोच आमचे
सर आलेऽऽ आमचे सर आलेऽऽ करित पंधरा वीस पोरांच्या गुचका सरांच्या जवळ आला. गुचका
हा फुलांचा असतो अन ती मुलं फुलांसारखीच होती.
सर
मला हेल्मेट द्या,
सर
मी टिफीन बॅग घेतो,
सर
मी वर्ग झाडुन काढला,
सर
मी आपल्या वर्गातील जाळे काढले
अशा प्रकारे एकेक विद्यार्थी
आपापली कामे सरांना सांगत होता. सरांच हेल्मीट वर्गात नेवुन ठेवाव,बॅग न्यावी या करिता आपसात भांडत, मी नेतोऽऽ मी
नेतोऽऽ करत विद्यार्थ्यांचा गलका पाहुन सरांचे सहकारी विटे सर ओरडले,"येऽऽ पोरहो, अरे सरांना गाडीच्या खाली तर उतरु
द्या!"
तोच पोरं बाजुला झाले.
दैनिक परिपाठ आटोपला.सर्वजन आपापल्या वर्गात
गेले. विठ्ठल सरही आपल्या वर्गात दाखल झाले. सर्व विद्यार्थी एकसाथ उभे राहुन गुड मॉर्निंग
सर म्हणाले.
" गुड मॉर्निंग एव्हरी वन!!
सिट डाऊन प्लिज!"
अस म्हणत सरही खुर्चीवर बसायला गेले. तोच खुर्चीवरील धुळ पाहुन सर म्हणाले,"टेबल पुसायच कापड कुठ आहे रे?"
कापडाची शोधा शोध सुरु झाली. तोच राधा नावाची
विद्यार्थीनी पुढे आली. तीने आपल्या निळ्या स्कर्टच्या कोपर्याने खुर्ची पुसली. अन
आपल्या बेंच वर जावुन बसली. काही कळायच्या आतच राधाची कृती घडली. तिच्या त्या
प्रेमाबद्दल काय बोलावं ते वाट्टेल त्या विषयावर तासंतास बोलणार्या सरांना कळालं
नाही ते निशब्द झाले.
अध्ययन-अध्यापनास सुरुवात झाली. पाहता पाहता
दुपार झाली. मध्यान्ह भोजनाची वेळ झाली. गावात भंडारा असल्याने शाळेची खिचडी न
खाता विद्यार्थी भंडार्यात जेवायला गेले.
शिक्षकही स्टाफरुम मध्ये टिफीन घेवुन जेवायला
बसले. सर्वांनी एकमेकांस शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपसात चर्चा चालु झाली, विटे सर
विठ्ठल सरांना म्हणाले,"आदर्श शिक्षकांची यादी जाहीर
झाली सर, आमाले वाटय यंदा तुमाले भेटाव लागत व्हता पुरस्कार.
पुढच्या महिन्यात रिटायरमेंट आहे तुमची!"
सरांनी स्मित हास्य केलं आणि,"काय
म्हणतात मुलं तुमचे?" अस बोलुन विषय बदलला.
जेवता-जेवता गप्पा रंगात आल्या. स्टाफ रुमच्या
बाहेर इयत्ता २ री चा मिलींद व गजानन एरझारा मारतांना विटे सरांच्या नजरेत पडले.
" काय रे मिलींद, काय झालं?"
"काई नाई सर!" दोघ लाजत थांबले.
त्यांना काहीतरी सांगायच आहे हे ओळखुन सरांनी
आत बोलवलं.
"काय म्हणतो, मिलिंद?
खांद्यावर
हात ठेवत विठ्ठल सरांनी विचारलं.
"काही नाही सर!" अस
म्हणत लाजत पायाचा अंगठा तो फरशीवर फिरवु लागला.
"काय रे गजानन काय म्हणणं आहे याच?" सरांनी
विचारलं.
"सर त्यानं तुमच्यासाठी भंडार्याच्या पंक्तीतुन बर्फी आणली." गजानन म्हणाला.
तोच सरांनी हात पुढे करताच, त्याने खाकी हाफपॅट च्या उजव्या खिशात हात घालुन बर्फी काढली व सरांच्या हातावर टेकवली.
"तू नाही खाल्लीस का?"सर म्हणाले.
"नाही सर मले नाही आवडत." अस म्हणत, मिलींद अन
गजानन लाजत पळत निघाले.
खेडे गावात पंक्तीत गोड पदार्थांची एक ना
दोनच वाड होते. त्यातही मला बर्फी आवडत नाही म्हणत आपल्या सरांसाठी बर्फी राखुन
ठेवणारा विद्यार्थी पाहुण त्यांचे डोळे पाणावले.
आपले सर आले, आपले सर आले म्हणत
हेल्मेट-टिफिन बॅग वर्गात नेण्याकरिता विद्यार्थांचा उडणारा गलका, आपल्या स्कर्टने खुर्ची पुसणारी राधा, सारे सारे
क्षणात सरांच्या डोळ्या समोर तरळुन गेले.
तोच विठ्ठल सर गर्वाने हातातली बर्फी समोर
करत आपल्या सहकार्यांना म्हणाले बंधु-भगिनींनो या पेक्षा मोठा पुरस्कार कोणता असु
शकतो. घ्या आपण वाटुन घेवुत, हा पुरस्कार.
"विटे सर तुमच्या मघाच्या
प्रश्नाच उत्तर मिळालं का? आपल्याला आदर्श शिक्षक व्हायच नाहीच हो आवडता शिक्षक
व्हायचयं!"
सरांच्या पाणावल्या डोळ्यांत बर्फी वाटुन खातांना विधुराच्या कन्या खाणारा श्रीकृष्ण दिसत होता.