आकांक्षा अनिल गोसावी
(मुख्याध्यापिका)
विद्यार्थ्याच्या पायाचे
ऑपरेशन होऊन एके दिवशी हा विद्यार्थी स्वतःच्या पायांनी चालत जेव्हा शाळेत आला,
त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे ते भाव आणि डोळ्यातून
वाहणारे आनंदाश्रू याच्या वर्णनाला शब्दच नव्हते. त्या माऊलीने त्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांचे कोटी कोटी आभार
मानले.
आजपासून
२० वर्षांपूर्वीचा शैक्षणिक काळ आठवला तर आजच्या इतक्या शैक्षणिक सोयी-सुविधा, सवलती त्यावेळी नव्हत्या. आज शिक्षण क्षेत्रात
फार मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे, अपंग समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून
आज दिव्यांग - अपंग विद्यार्थ्यांना
सर्वसामान्य विद्यार्थांप्रमाणेच हव्या त्या शाळेत प्रवेश घेता येतो आणि शिक्षण
प्रवाहात दाखल होता येते. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
प्रगतीसाठी शासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. पण २० वर्षांपूर्वी अशी
परिस्थिती नव्हती. या विद्यार्थ्यांसाठी
फारशा सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही महानगरपालिकेतील एका शाळेत आर्थिक
दृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि पायाने अपंग
असलेल्या अशा एका विद्यार्थ्याला त्याची आई कमरेवर उचलून घेऊन शाळेत आणून बसवीत
असे. शाळेची इमारत तीन मजल्यांची असून तळाला हॉल असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वर्ग
व्यवस्था पहिल्या मजल्यापासून सुरू होत होती. त्यावेळी शाळेला रॅम्प किंवा अपंग विद्यार्थ्यांसाठी चाकाची खुर्ची
अशा सोयी उपलब्ध नव्हत्या.
या मुलाची आई जिद्दीने
व चिकाटीने दररोज नियमितपणे मुलाला कमरेवर उचलून घेऊन शाळेत पहिल्या मजल्यावरील
वर्गात आणून बसवी आणि शाळा सुटल्यावर घेऊन जात असे. हे फक्त एक आईच करू शकत होती. आणि तेही कोणत्याही
प्रकारची तक्रार न करता. हा विद्यार्थीही तसाच गुणी व हुशार होता. त्यामुळे शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचाही
तो आवडता होता. त्यावेळेच्या मुख्याध्यापक मॅडम यांनी या विद्यार्थ्यांच्या पायावर
वैद्यकीय उपचार होऊन तो स्वतःच्या पायावर चालेल यासाठी प्रयत्नांची
पराकाष्टा केली. महानगरपालिकेच्या अशा विद्यार्थ्यांना याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेतून कोणत्या
प्रकारचा उपचार करता येईल याचा पाठपुरावा करून शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश
आले. विद्यार्थ्याच्या पायाचे ऑपरेशन होऊन एके दिवशी हा विद्यार्थी स्वतःच्या
पायांनी चालत जेव्हा शाळेत आला, त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे ते
भाव आणि डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू याच्या वर्णनाला शब्दच नव्हते. त्या माउलीने
त्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांचे कोटी कोटी आभार मानले.
महानगरपालिकेच्या शाळेत दाखल होताना पायाने अपंग असलेल्या विद्यार्थ्याला
सातवी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जाताना स्वतःचे अपंगत्व नाहीसे करून
खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या आमच्या
मुख्याध्यापकांमधील कनवाळूपणा, शाळेतला विद्यार्थी हा केवळ आपला विद्यार्थी नसून
आपलं मुल आहे या भावनेने त्याच्या भल्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे काय असते
हे त्यावेळी आम्हा
शिक्षकांना उमगलं. या विद्यार्थ्याने ही
अश्रू भरल्या नयनांनी शाळेच्या शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांचा निरोप घेतला.
त्यानंतर दहा वर्षांनी
हाच विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटायला येतो. त्याचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरीनिमित्त
अमेरिकेला जाण्याची संधी त्याला उपलब्ध झाली होती. आपल्या शिक्षकांना भेटावे व आपल्या यशस्वी
वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावे यासाठीच तो त्यांना भेटायला आला होता.
कठीण परिश्रम करून
दुबळ्या शारीरिक परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठणारे असे विद्यार्थी आठवले की
मन अभिमानाने भरून येते.
आणि मग आपोआपच मन गुणगुणू लागते .
अशी पाखरे येती
आणिक स्मृती ठेवुनी जाती..