श्रीमती खान तरन्नुम अब्बास
जिल्हा
परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर,
ता. श्रीरामपूर, अहमदनगर
मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे
असून, बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक
स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक, सामाजिक व तांत्रिक बदल
झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी
पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची
चिकित्सा होणे आवश्यक आहे.
आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश
घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते, त्या विषयांच्या तासाला बसणे,
क्रमिक पुस्तके वाचणे, संदर्भग्रंथ हाताळणे,
परीक्षा देणे, ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे
गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही.
शास्त्रशुद्ध अभ्यास, बालमानसशास्त्र, मेंदूच्या
जडणघडणीचा प्रवास, लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा,
नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता, अनुकरणशीलता,
संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव, टीव्ही व मोबाइलचा ग्रहणक्षमतेवर होणारा परिणाम, आधुनिक
उपकरणे व साधनांच्या आहारी जाणे, इंटरनेट व सोशल मीडियाचा
बरे-वाईट परिणाम, घरात येणाऱ्या पैशांची साधनशूचिता, घरातील वातावरण व नातेसंबंधातील जिव्हाळा, एकमेकांशी
सुसंवाद या घटकांचे महत्त्व पुढील पिढीच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठे आहे. या
घटकांच्या संदर्भात मुळात पालकच अनभिज्ञ असतील तर त्याचा दोष पुढील पिढीला देता
येणार नाही.
भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. प्रचंड मानवी संसाधनाचा देश
म्हणून जगात भारताकडे पाहिले जाते. हे भांडवल आज देशातल्या शहराशहरांत व
गावागावांत व्यवस्थित घडविले जात आहे की नाही, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं
नाही तर आपण निरक्षरांची
महाऊर्जा बनू. असं घडू द्यायचं नसेल तर शिक्षणाच्या पायाभरणीत पालकांना भरीव
योगदान द्यावं लागणार आहे.घराघरांत आज दिसणारे चित्र विदिर्ण करणारे आहे. आपल्या
मुलांना वेळ देऊ न शकणारे पालक त्यांना महागडे मोबाइल फोन देत आहेत. त्यात मंद
बधिर करणारे गेम टाकून देत आहेत. गरज नसताना लॅपटॉप देत आहेत. या लॅपटॉपमध्ये
विविध प्रकारचे सिनेमे उपलब्ध आहेत. मुलांना महागड्या वस्तू मागताच मिळतात.
पॉकेटमनीला कमी नाही. महागडी हॉटेल्स, फास्ट फूड, आइस्क्रीम
पार्लर्स, कॅफे या बाबींवर खर्च होतात. बदलत्या काळात एकच
अपत्य असल्याने त्याला काय देऊ अन् काय नको, असे झालेले पालक
नको ते सर्व देऊन आपल्या पाल्यांचा शैक्षणिक पाया प्राथमिक शिक्षणापासूनच उद्ध्वस्त
करीत आहेत. अनुकूलतेच्या अतिउपलब्धतेमुळे नकार पचविण्याची क्षमता गमावून बसलेली
शालेय वयातली लहानगी मुले नकार मिळाला म्हणून आत्महत्या करायला मागेपुढे बघत नाही.
सामान्य आर्थिक स्तरातील पालकांना मुलांच्या गरजा पुरविताना प्रचंड तणावास सामोरे
जावे लागते. मात्र, आपण कुठेही कमी नाहीत या दिखावूपणाला बळी
पडलेल्या पालकांना पुढे हे भोगणे क्रमप्राप्तच होते.
मुलांचे आई वडील नोकरी निमित्त जर घराबाहेर जात असेल तर
मुले स्वत:च मार्ग काढतात. निर्णय घेतात.
स्वत:च्याच चुकांमधून शिकतात आणि स्वत:च्या निर्णयक्षमतेवर त्यांचा विश्वास
अधिकाधिक वाढत जातो आणि नेमकी हीच गोष्ट पुढे पालकांना त्रासदायक वाटते. त्यातही
महापालक आणि पालक यांच्यामधल्या वादविवादांची मुले साक्षीदार झाली, तर ती
त्यांचा चतुराईने गैरफायदाही घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची
गोष्ट म्हणजे मुलांशी नित्य, नियमित केलेला मनमोकळा संवाद. दिवसातील निदान एक
वेळ अशी असावी, ज्या वेळी पालक व मुले आपापल्या दिवसभरातील
घडामोडी, सहवासात आलेल्या इतर व्यक्ती, आनंदाचे, रागाचे, दु:खाचे क्षण
एकमेकांबरोबर मोकळेपणाने बोलू शकतील. या वेळेत अभ्यासाविषयी, परीक्षेविषयी बोलणे कधी तरी असावे.
काय करावे, कसे वागावे,
काय योग्य, काय अयोग्य या विषयी बोलण्याइतकेच
घरातील मोठ्या व्यक्तींनी ते वागण्यातून दाखवणे हे परिणामकारक असते. उदा. मुलांनी
टीव्हीवरील कार्यक्रम जास्त पाहू नयेत असे वाटत असेल, तर
पालकांचाही टीव्ही पाहण्याचा वेळ मर्यादित असावा.
नियम
आणि अपेक्षा वास्तवाला धरून आहेत ना, याचा नेहमी विचार करावा. प्रत्येक लहानसहान
गोष्टींवरून त्यांच्या मागे लागणे, टोचून बोलणे, उपहासयुक्त
बोलणे टाळावे. मुले मोठी होत असताना प्रत्येकच गोष्टीची, ‘नियमानुसारच
केली पाहिजे’ व ‘नियम शिथिल केले तरी
फारसे बिघडत नाही’ अशी विभागणी करावी. उदा. कपडे, केशभूषा, त्यांच्या खोलीची, कपाटाची
रचना, व्यवस्था या बाबतीत आपले नियम न लादता फक्त
सूचना/प्रस्ताव द्यावेत. परंतु स्वत:च्या गोष्टींची जबाबदारी घेणे, वेळेत घरी येणे अशा बाबतीत काही नियम परस्पर संमतीने ठरवावेत व ते
पाळावेत. मुलांशी ‘एक स्वतंत्र
व्यक्तिमत्त्व’ अशा दृष्टीने वागावे. त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल अशा कृती, वाक्ये टाळावीत.
त्यांच्या चुका अपमानास्पद शब्दात न सांगता, प्रांजळपणे
सांगाव्यात.
कालच्या आणि आजच्या
मुलांमध्ये पडलेला आणखी एक फरक म्हणजे, तंत्रज्ञानाची झपाट्याने
विस्तारलेली क्षितिजे आणि त्यांचा आपल्या सर्वांच्याच जीवनावर झालेला परिणाम.
इंटरनेट, मोबाइल फोन्स आणि माहिती तंत्रज्ञानाने प्रत्येक
क्षेत्राची परिभाषा बदलून गेली आहे. आपली मुले या तंत्रज्ञानाशी लहानपणापासून
परिचित झाली आहेत. त्यामुळे आजची मुले अतिशय सफाईने ते वापरू शकतात. स्वत:च्या
ज्ञानात सहजपणाने भर घालू शकतात. यातील काळजीची बाजू ही आहे, की अत्यंत विकृत व घातक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या
मुलांपर्यंत पोचत आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीचा वापर नेमका योग्य प्रकारे कसा
करावा हे न समजल्याने मुले गोंधळून जात आहेत. नेमकी इथेच पालकांनी त्यांची भूमिका
बजावायची आहे. त्यासाठी मुले नेमके काय वाचत आहेत, बघत आहेत
याचे पालकांनी भान ठेवणे गरजेचे आहे
मुलांमध्ये आलेली निष्क्रियता, त्यांचा बळावलेला आळस,
गमावलेले शरीरस्वास्थ्य, वाढलेली हिंसात्मक प्रवृत्ती,
त्यांच्यातील उद्धटपणा व घटलेली सहिष्णुता याचा परिणाम त्यांच्या
शैक्षणिक कामगिरी व गुणवत्तेवर होतो. याचा साराच दोष शाळेवर टाकता येणार नाही.
शाळेत दिवसातील सात तास जातात. इतर वेळ जेथे जातो ते घटकही याला जबाबदार आहेत. या
सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी व पुढच्या पिढीचा शैक्षणिक पाया भक्कम
करण्यासाठी पालकांना मोठे योगदान द्यावे लागेल. याची सुरुवात पालकांना स्वत:पासून
करावी लागेल. कला, साहित्य, क्रीडा,
वाचन, लिखाण, चिंतन व
मनन यांसारख्या उपक्रमांमध्ये पालक स्वत:ला जोपर्यंत वाहून घेत नाही तोपर्यंत नवी
पिढी टीव्ही, सीरिअल्स, इंटरनेट गेम्स यातून बाहेर
पडणार नाही. नैतिक मूल्यांचे अधिष्ठान पालकांच्याच ठिकाणी नसेल तर ते मुलांमध्ये
कसे निर्माण होईल?
आयुष्यात चारित्र्याची बांधणी ज्या भक्कम पायावर होते त्या शैक्षणिक
बाबींची पायाभरणी करण्यासाठी पालकांना प्रथम स्वत:ला घडवावे लागेल, तरच पुढील पिढी घडेल. अन्यथा आधी मेकॅलेने व आता पाश्चात्त्य संस्कृतीमधील
चुकीच्या गोष्टींनी भारताला उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. यापुढे आपल्याला
आधुनिक मेकॅले बनायचे आहे काय, याचा निर्णय पालकांनी घ्यायची
वेळ आली आहे.