सुमन तिजोरे
जि.प. प्राथ. शाळा वडाळा बहिरोबा
ता.नेवासा, जि.
अहमदनगर
मूल्यशिक्षण हा
शब्द मूल्य आणि शिक्षण या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे मूल्य हा मुळात
संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ मोल असा आहे शिक्षण हा मराठी शब्द शिक्षा या संस्कृत
शब्दापासून तयार झालेला आहे शिक्षा हा शब्द शिक्ष् या धातूपासून म्हणजे मुलं रूपा
पासून तयार झालेला आहे शिक्ष् म्हणजे ज्ञान मिळवणे उपदेश करणे यानुसार मूल्य
शिक्षण म्हणजे मोलाची ज्ञान प्राप्ती किंवा मोलाचा उपदेश करणे मूल्यशिक्षला
इंग्रजीत value
Education म्हणतात या इंग्रजी शब्दाचे मूळ valer
या लॅटिन शब्दात आहे, valer चा अर्थ मूल्यवान असणे असा
होतो तर Education या इंग्रजी शब्दाचे
मूळ educatum, educere educare या लॕटीन शब्दांमध्ये Educcatum
चा अर्थ शिकविणे असा होतो Educare चा अर्थ उन्नयन करणे हा आहे म्हणजे पालन करणे, पोषण करणे,
संवर्धन करणे होय या उत्पत्ती वरून असे स्पष्ट होते की मूल्य शिक्षण म्हणजे
मूल्यवान असण्यासाठी शिकविणे, उन्नयन करणे पालन करणे, पोषण करणे, व्यक्तीच्या
शारीरिक मानसिक सामाजिक समायोजन यांना कार्यान्वित करणाऱ्या जीवन तत्वाचे शिक्षण
म्हणजे मूल्य- शिक्षण मनावर व वर्तनावर इष्ट नियंत्रण ठेवून तू संस्कारशील मने
घडविणार्या बाबींचे शिक्षण म्हणजे मूल्यशिक्षण.
मूल्य ही प्रत्येकाची गरज आहे मूल्यही काही तयार मिळणारी बाब
नाही मूल्य याचा प्रत्यय येत असतो वर्तनातून. वर्तनावर योग्य नियंत्रण ठेवत
वर्तनात सुपवर्तन साधणाऱ्या बाबी मूल्याचे स्रोत असतात.
व्यक्तीच्या सुवर्तनातून मूल्य निदर्शनास येत असते. आजचा विद्यार्थी उद्याचा
कर्तव्यनिष्ठ सद्वर्तन सुजाण नागरिक घडत असतो हे सर्व शक्य होते शिक्षणाने.
लिहिता-वाचता व्यवहारज्ञान करता येणे म्हणजे शिक्षण असे नाही तर याबरोबरच मौलिक
विचारांचे,सद्वर्तनाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असते.शिक्षण आणि मूल्य या
दोन गोष्टी वेगळ्या करता येणार नाहीत. जे कार्य मूल्याचे, तेच
कार्य शिक्षणाचे. जे मूल्यामुळे घडते, आणि घडत राहणार. मूल्य
म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण म्हणजे मूल्य. ढग आणि पाऊस, सुमन
आणि सुगंध यांच्यात जो अनुबंध आहे तोच अनुबंध शिक्षण आणि मूल्य यांच्यात आहे.
मूल्यशिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण हे खरोखर एखाद्या
वटवृक्षाच्या झाडाप्रमाणे आहे. मूल्यशिक्षण या शब्दामुळे मूल्यशिक्षण आणि
शिक्षणातील मूल्य वाढते. मूल्यापासून शिक्षण आणि शिक्षणापासून मूल्य वेगळे करता
येत नाही.
उष्णतेने पाण्याची वाफ होऊन तयार झालेला ढग हा पावसाचा असतो. पण पांढऱ्या ढगाला कोणी पावसाचा ढग म्हणत नाहीत. तोच पांढरा ढग काळा झाला की पावसाचा ढग म्हटला जातो. मूल्यशिक्षण हा विषय असाच आहे. काळे ढगाचे आणि पावसाचे हे नाते तेच शिक्षणाचे. आणि मूल्याचे. आईचे आणि पान्ह्याचे जे नाते तेच शिक्षणाचे. आईपासून वात्सल्य वेगळे करता येत नाहीतसेच मूल्यापासून शिक्षण वेगळे करता येत नाही. मूल्यातून शिक्षण आणि शिक्षणातून मूल्य, विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जातात. त्यासाठी शिक्षकांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. शिक्षकांना मूल्य माहीत असावीत एवढेच नाही तर कोणती मूल्ये कोणत्या अध्ययन अनुभव, प्रसंग, घटना यामधून रुजतील याचे नियोजन शिक्षकांकडे असावे. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी पास करणे हे जर शिक्षकांची ध्येय असतील तर मूल्य शिक्षणाच्या वाटा बंद करण्यासारखेच आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजविता येतात. प्रत्येक पाठ शिकवणे म्हणजे त्याला तो वाचता येणे, प्रश्नांची उत्तरे लिहिता येणे, व सांगता येणे एवढ्यापुरताच मर्यादित नसतो. तर त्या पाठातून विद्यार्थ्यांमध्ये कोणते मूल्य रुजविणे आवश्यक आहे. हे प्रथम शिक्षकांनी समजून घ्यावे. प्रत्येक पाठातून द्यावयाच्या मूल्याची यादी शिक्षकांकडे असावी. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभवाचे नियोजन करावे. यामुळें निश्चितच विद्यार्थ्यांच्या जीवनास एक नवीन आकार मिळेल. मूल्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बहरुन जाईल. त्यासाठी शिक्षकांनी मुल्यांचा अभ्यास करावा.
मर्मदृष्टी, सर्जनशीलता,
अचूकता, संरक्षण, एकसंघता,
धैर्य, शौर्य, संघर्ष,
वात्सल्य, संगोपन, जिव्हाळा,
संस्कार, सौजन्यशीलता, समाजशीलता,
सत्य, न्याय,नीती,
नियमबद्धता, एकता, समता,
बंधुता, नियोजन, आयोजन,
उपक्रमशीलता, सेवा, व्यवस्था
,समन्वय, विश्वसनीयता, वक्तशीरपणा, अनियमितता, सहकार्य,शिस्त, नेतृत्व, संवाद,
समर्पकता, सुस्पष्टता, विस्तार, संक्षेप, कला,
अभिरुची, सौंदर्यदृष्टी, कल्पकता, क्रीडाप्रेमी, सांघिक
भावना, खिलाडूवृत्ती, स्वातंत्र्य,
समता,बंधुता. अशी अनेक मुल्ये आहेत आणि ही
सर्व मुल्ये शिक्षणा मधून द्यावयाची असतात. मूल्य शिक्षण म्हणजे एक वटवृक्षच
आहे.या वटवृक्षात अनेक पारंब्या असतात आणि या पारंब्या म्हणजेच मूल्य. वटवृक्षाचा
प्राण म्हणजे पारंब्या त्याचप्रमाणे शिक्षणाचा प्राण म्हणजे मूल्य. मूल्यांचा विचार न करता शिक्षण
देणे म्हणजे आंधळ्याच्या हातात काठी देण्यासारखे आहे.
तरी
शिक्षकांनी डोळसपणे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला तर
निश्चितच आपल्या समोरील विद्यार्थी सद्वर्तन शील सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक
घडतील. मूल्यांच्या अभावामुळे अनेक जण एकाकी, एकांगी, हतबल
निरुत्साही, नैराश्यग्रस्त, हिंसाचारी
बनत आहेत. त्यामुळे मानवतेचा व्यापक संदेश देणारे, चांगला
माणूस घडविणारे, प्रत्येक मुलांचे वेगळेपण जपणारे शिक्षण
द्यायला हवे म्हणूनच मूल्य शिक्षणाचा विचार करण्याची पुन्हा गरज भासत आहे.
1) वक्तशीरपणा
2) सर्वधर्मसहिष्णुता
3) वैज्ञानिक दृष्टिकोन
4) नीटनेटकेपणा
5) राष्ट्रभक्ती
6) राष्ट्रीय एकात्मता
7) सौजन्यशीलता
8) श्रमप्रतिष्ठा
9) स्त्री पुरुष समानता
10) संवेदनशीलता.
ही शासनाने निर्धारीत केलेली मूल्य आहेत.