भावना कुळकर्णी
अशोका युनिव्हर्सल स्कूल
नाशिक
बघा माझा इठुराया कसा बोलतो माझ्याशी, म्हणतो
मानसान मानसाशी मानुस बनून वागावं, अड़ल्या नड़लेल्या मदत करावी, आंधळ्याचा ड़ोळा बनाव, लंगड़याचा पाय बनाव, मदतीला धावुन जावे, कुणाची तरी काठी होऊन जगावे.
लोकांनाही मग खरच वाटायच म्हातारीचं. ते म्हणतं लई भाग्यवान
बघा म्हातारी,
विठोबा प्रत्यक्ष बोलतो तिच्याशी.
चुलीत दोन चार लाकड़
आणखी सरकवुन म्हातारीने तिच्या त्या पोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळायला ठेवला.
उकळत राहणाऱ्या
चहा प्रमाणेच म्हातारीच मनही आतुन ढवळून निघत होतं...
तीन दिशेला
गेलेले तिचे तीन पोरं. त्यातला धाकला तिला सोड़ायचा नाही पण सगळयात मोठा अन मधला
गेले होते सोड़ुन. पण आज खुप वर्षानी तीचा मोठ्ठा सायेब झालेला पोरगा आज घरी येणार
होता. खर म्हणजे पोटचा गोळा घरी येणार म्हणून म्हातारी खुप आनंदात होती, मनातुन धास्तावलेली. त्याला कारणही तसच होत म्हणा. जमीनजुमला, शेतीवाड़ीच काय ते निपटुन टाकायचे म्हणून हे पोरग वस्तीवर येणार होत, असं तिला धाकला बोलला होता. धाकला बाकी समजुतदार धोरणी
निघाला. नाही तर ह्या दोघांनी तर म्हातारीला कित्येक वर्षे विचारल देखील नाही.
सुनांनी तर कधीही सणासुदीला पण म्हातारीच्या झोपडीवजा घरात पाय ठेवला नव्हता.
'असो, आता काय व्हायच ते व्हईल, पोरग येतय घरी नातवाला घेऊन तर त्याला आजिबात दुखवायच
नाही अस तिने मनोमन ठरवलेल.
बाकी अशीही म्हातारी
खमकी होती म्हणा. आजवर येतील ते संकट झेलत, ओला दुष्काळ, कोरड़ा दुष्काळ,
चित्र: अमित भोरकडे
कधी मैल न मैल पायपीट करत लांबून पाणी आणून
कित्येक जनावरं जगवलीत तिने. काटकसर करून धन्याबरोबर सुखात संसार केला. एकदा
रात्रीतुन वस्तीवर चोर शिरले तर धन्याची झोप मोड होऊ न देता एकटीनेच खुरपणी हातात
घेऊन पिटाळुन लावलेले चोर.
तीचा धनी गेल्यापासुन
थोड़ी अबोल झालेली म्हातारी पण खमकी होती. फक्त पोरासमोर ती अगदी लोण्यासारखी
वितळायची. आणि नातवंड बघायला मिळाली नाहीत अजून पण खुप जीव.
यंदाच्या उन्हाळ्यात
लेकरबाळ घरी येणार म्हणून म्हातारीने घरअंगण सगळे कस लख्ख सारवुन घेतलेल.
तुळशीवृदांवनाला छान रंगरंगोटी केली. फड़ताळातल कपाट छान रचुन ठेवलेल. एक नवा माठही
घेऊन ठेवलेला.
रानातले बोर, चिंचा विलायती चिंचा, पेरु, पपई अन काय काय.. आणुन छान निवड़ुन ठेवलेल म्हातारीने
नातवासाठी.
अंगात निळसर झाक असलेल
मातकट रंगाच नीटनेटक स्वच्छ लूगड़, दोन्ही हातभर काचेच्या बांगड्या, गळ्यात तुळशीची माळ, कानात कुड़ी अन बुगड़ी, हनुवटीवर तिन ठिपके गोंदवुन
घेतलेले, नाकात धन्याने हौसेने घालायला दिलेली नथ आणि कपाळावर तिच्या आवड़त्या
विठोबा रायाचा बुक्का असा पेहराव करून म्हातारीने पहाटे पहाटे
शेतीवरल्या राखणदार महादेवला आर ए म्हादु च्या ठिवलाय तुझा, ये लवकर आटपुन अशी
आरोळी दिली की म्हातारीने कामाला सुरुवात केली हे गाव समजुन जायच.
पोरंबाळ नसली घरात तरी म्हातारी कधीच
रिकामी दिसायची नाही कुणाला. धाकला कामावर ड़बा घेऊन गेला की दिवसभर तिच काम सुरु
राहयच. चंदाला चारा आण, मागच पुढच अंगण झाड़, शेंगा
वाळवुन ठेव,
कुठे भाज्या लाव, चिंचा फोड़ुन ठेव, मिरच्या खुड़ुन ठेव, कापुस वेचून आण, मग
त्याच्या वाती वळत बस, धान्य निवड़ुन ठेव, शेण
आणुन गोवरया थाप,
कधी जमिन सारव तर कधी अड़ल्या नड़लेल्या मदत कर असे किती तरी
काम म्हातारीने अंगवळणी पाडून घेतले होते.
त्यात भर म्हणजे
परिपाठाचा नेम कधी मात्र म्हातारीने मोड़ला नव्हता. तिनेच स्थापना केलेला विठ्ठल
मंदिरात हा नेम चाले. आणि परिपाठानंतर न चुकता म्हातारीचा हाताचा घरच्या दुधाचा
चहा सगळयांनी प्यायचा हा नेम. त्या चुलीवरच्या चहाची
रंगत काही औरच. कारण मग त्या चहासोबत गावच्या, वेशीच्या, इकड़च्या,
तिकड़च्या गप्पा रंगत आणि तिन्हीसांजा झाल्या की सगळे
आपआपल्या घरच्या दिशेने जात पुन्हा दुसऱ्या दिवशीची चहाची वाट बघत.
'हयो कपभर चहा ह्या
थकलेल्या जीवांला पाजुन माझी ओंजळ समाधानाने भरुन जाते हो' अस
म्हणत म्हातारी आनंदाने सगळयांना चहा पाजायची. ह्या चहानेच बांधुन ठेवलेत माझ्या
माणसांना, लई काय नाय करत मी म्हणून ती वेशीवरच्या वासुदेवालाही चहा पाजायची.
ह्या इतक्या वयातही म्हातारी कशी तुकतुकीत हाय अन् सगळ्याच
करती,
अस काहीतरी कानावर पडल की समोरच्या मंदिरातील विठोबाला
तिथुनच नमस्कार करून म्हणायची, "माझ काय खरय बाबाहो, त्यो इठुराया करुन घेतो माझ्याकड़ुन. लई जीव हाय त्याचा माझ्यावर. माणसापरिस
कधी भक्तांसंग बेईमानी नाही की धोका नाही.
विठ्ठलाचा म्हातारीवर
जीव होता तसा तिचाही विठ्ठलावर भारी जीव. जीव ओतुन ती त्या एकसंध काळया पाषाणाला
मनापासून पुजायची.
सणासुदीला काही गोडधोड केले की पहिला नैवेद्य तिच्या
विठ्ठलाला दिल्याशिवाय ती पाणी देखील प्यायची नाही. थंडी असो, वारा असो,
की ऊन तिच्या विठ्ठलाची ती खूप काळजी घ्यायची. त्याच्या
पाशी मन मोकळं करत गप्पा मारायची. काही अड़ल नड़ल तर विठ्ठलाशी एकरुप होऊन बोलायची
तासंतास. भुपाळीला, काकड़ आरतीला तर लोकांना सांगायची, बघा माझा इठुराया कसा बोलतो माझ्याशी, म्हणतो मानसान मानसाशी
मानुस बनून वागावं, अड़ल्या नड़लेल्या मदत करावी, आंधळ्याचा ड़ोळा बनाव, लंगड़याचा पाय बनाव, मदतीला धावुन जावे, कुणाची तरी काठी होऊन जगावे.
लोकांनाही मग खरच
वाटायच म्हातारीचं. ते म्हणतं लई भाग्यवान बघा म्हातारी, विठोबा
प्रत्यक्ष बोलतो तिच्याशी.
एके दिवशी पावसाळ्यात
गावच्या नदीला पुर येतोय हे कळाल्याबरोबर म्हातारी दिवसभर विठुरायाच्या पायाजवळ
जाऊन बसली,
म्हणली "माझ्या भोळया इठुराया, गावाला
पुर आला तर मी काही इथनं हालत नाही मरेस्तोवर, तुझ्या
संगेंच राहिली तर राहिली नाही तर जाईल. तुच आता जे करशील ते
खर. तसा तो पुर रात्रीतुन आला तसा ओसरलाही.
म्हातारीने मात्र
अश्रूच्या पुरांवाटे तिच्या त्या लाड़क्या इठुरायाला न्हाऊ घातलेल आठवतय.
आज तो दिवस आला आणि म्हातारीला लांबुनच
तिचा सायेब पोरगा,
सुनबाई अन तिन वर्षाचा नातु दिसला. तशी म्हातारीची लगबग
सुरु झाली. पोरग भेटल्याच्या आनंदापेक्षा नातु भेटल्याचा आभाळभर आनंद म्हातारीच्या
त्या इवल्याशा झोपड़ीत काही मावत नव्हता. आल्या आल्या तिने
लेकाला, सुनेला पोटभर जेवु घातले. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. सायेब पोरगा
म्हणत होता की आता हे जमीनजुमला, शेतीवाड़ी विकायला हवी.
म्हातारीने पण त्यांच्यासोबत शहरात जाऊन राहावे.
तशी म्हातारी बैचैन
झाली. "आरं, पन का म्हुन आस करायला लागत ते तर सांग बाबा.
तस सुनबाई बोलली 'तुमच्या नातवासाठीच.
तशी बिचकुन म्हातारीने बाहेर खेळणाऱ्या नातवाकड़े बघितल.
"आई " त्यो
बोलत नाही ग जन्मापासून. आजवर एकही शब्द बोलला नाही तो. त्याला उपचार करण्यासाठीच
पैसे हवेत म्हणून हे जमीनजुमला..
तस त्याच बोलण अर्धवट
सोडून म्हातारी उठली अन नातवाला कड़ेवर घेऊन ती झपझप पावलं टाकत विठोबाच्या देवळात
गेली.
त्याच्या पायावर नेऊन ठेवल ते पोरग अन
म्हणली,
तुच म्हनतोस न्हव मानसान मानसाशी मानुस बनून वागावं, आंधळ्याचा ड़ोळा बनाव, लंगड़याचा पाय बनाव मंग आता रं, माझ्या बाळाला का र अस ठिवलयेस. अस म्हणत परत घरात येऊन रात्रभर जागून काढलेली
तिने.
पहाटे पहाटे म्हातारी
उठली अन सवयीने तिन तिच्या लाड़क्या इठुरायाला नमस्कार घातला अन त्याच पोच गेलेल्या
पातेल्यात चहा उकळायला ठेवला.
तसा तिचा नातु ड़ोळे चोळत समोर येऊन उभी
राहिला अन पातेल्याकड़ बोट दाखवत बोलला 'चा दे न्, आजी ".
तशी म्हातारीच्या
ड़ोळयातुन घळघळा अश्रू व्हायला लागले.
आहे त्याच जागी तिने भक्तीभावाने विठुरायाला नमस्कार केला.
मात्र त्यानंतर म्हातारी कधीच विठ्ठलाशी बोलु शकली नाही……
कारण तिचा विठ्ठल आता कायमचा मुका झाला होता.