मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षेची गरज आहे?

 


प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

एस के पोरवाल महाविद्यालय, कामठी जि. नागपूर

आजचे विद्यार्थ्यांचे जीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हेही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे. परीक्षा पद्धतीनेच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून तर आजच्या विद्यार्थ्यां बद्दल बोलताना विद्यार्थी परीक्षार्थी झाले आहे, असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी व परीक्षार्थी असं म्हटलं जातं असलं तरी विद्यार्थी जीवनांत परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. वर्षभर केलेल्या कार्याचं मूल्यमापन म्हणजे परीक्षा होय.

        परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची कसोटीचं. या कसोटीत जे उत्तीर्ण झाले तेच पुढं तरले. जे राहिले ते गळले.   परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन शक्तीचा उपयोजन व कौशल्याचा पडताळा घेता येतो. विद्यार्थी कुठं कमी पडतात, विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे कोणते, त्याची योग्यता, त्याची श्रेष्ठता या सर्व गोष्टींचे मूल्यमापन करण्याचे एक तंत्र म्हणजे परीक्षा होय.

        विद्यार्थी जीवनात परीक्षेला अनन्यसाधारण महत्व असलं तरी आज कुठंतरी परीक्षांचे महत्व कमी होत असल्याचं देखील दिसून येत आहे. काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिकांमुळे गुणांची खैरात मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यां- मधील परीक्षेचे महत्त्व कमी झाले आहे. यातच शिक्षण विभागाने दहावीत गणित आणि इंग्रजी विषयाला वैकल्पिक विषयांचा पर्याय दिला जात असल्याने परीक्षेबाबत गंभीरता कमी होत आहे.

        दरम्यानच्या काळात, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणामुळे अगोदरच विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल गंभीरता राहिलेली नव्हती. शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी परिक्षांचे महत्व पटवून दिल्याने परत या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला सुरुवात झाली.

        कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन थेट परीक्षाच रद्द करण्याचा सीबीएसईचा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटतो. सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे, राज्य मंडळही त्याच निर्णयावर आले आहे. राज्य मंडळाने देखील यावर्षी दहावीची परीक्षा घेणार नसल्याचे स्पष्ट करत एक प्रकारे परीक्षेचे महत्व संपवून टाकले. हा निर्णय जरी परिस्थिती जन्य असला तरी परीक्षांचे महत्व संपत असल्याची ही नांदी तर नाही ना?

        नव्या शैक्षणिक धोरणानुसार याची सुरुवात कोरोनाकाळात होत आहे की काय? नव्या शैक्षणिक धोरणात दहावीचे महत्त्व तसेही संपले त्याची सुरुवात तर झाली नाही ना? असाही प्रश्न पडायला लागतो. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला ही बाब याठिकाणी अधोरेखित करणे देखील आवश्यक आहे.

        विविध कारणांनी परीक्षांचे महत्व संपत असल्याचं भास होत असला तरी विद्यार्थी जीवनात परीक्षांचे महत्व कधीच संपणार नाही. विद्यार्थ्यांची तर्कबुद्धी, अनुमान, आकलन सामर्थ्य, विश्लेषण व बुद्धीमत्ता तीन तासांच्या लेखी परिक्षांतूनच तपासली जात असते.

        सोन्याला दागिना घडविण्यासाठी घासणे, तोडणे, तापवणे, ठोकणे या परीक्षातून पार व्हावे लागते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांला पारखण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, शील, गुण आणि कर्म या परीक्षातून पार व्हावे लागते. म्हणून परीक्षा हे संकट नसून आपल्या ज्ञानाची तपासणी आहे. आपण जे ज्ञान घेतो ते कितपत योग्य आहे, किती खरं आहे याची चाचणी परीक्षांतून घेतली जाते. आपल्या चुका परीक्षेतून कळतात. एक स्पर्धा निर्माण होते, ज्यातून ज्ञान मिळवण्यासाठीची उत्सुकता आणि धडपड वाढते. या स्पर्धेतून विकासाची संधी मिळते आणि गुणांना वाव मिळतो. याचा योग्य उपयोग करून घेतल्यास व्यक्तीमत्व घडत जाते.

        आजपर्यंतची थोर व्यक्तींची अनेक उदाहरणे पाहता ते ज्ञानार्थीच होते किंवा आहेत हे कळते. भारताचे भूषण ठरलेल्या व्यक्तींविषयी सखोल अभ्यास करता त्यांची शिक्षण आणि ज्ञान याविषयीची धडपड कळते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी विवेकानंद, रविन्द्रनाथ टागोर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. जयंत नारळीकर तसेच भारताचे राष्ट्रपती स्व. डॉ. अब्दुल कलाम सारेच ज्ञानासाठी धडपडले हे आपल्याला माहित आहेच. ज्ञान हे अनुभवातून मिळते आणि अनुभव येण्यासाठी परीक्षा द्यावीच लागते. ज्ञानार्जन कधीच व्यर्थ जात नाही. मिळालेले ज्ञान कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात उपयोगी ठरू शकते. प्रत्येकालाच आयुष्याची परीक्षा द्यावी लागते. कधी आर्थिक, कधी शारीरिक तर कधी मानसिकदॄष्ट्या अनेक परिक्षांना सामोरे जावे लागते. त्यातून माणसाचे विविध पैलू पडतात. हिर्‍याचेच उदाहरण पाहता-खाणीत सापडणार्‍या या दगडाला रत्नपारखी पैलू पाडतो. या कणीदार हिर्‍यावर कोंदण चढवले तर दागिना बनतो, जो लाखात एक उठून दिसतो. अशाप्रकारेच सामान्य व्यक्तीही ज्ञानप्राप्तीने खुलते आणि परीक्षेने त्यात परीपक्वता येते. विद्यार्थ्यांचे परीक्षा हे आपल्या विकासासाठीच बनविलेले प्रवेशद्वार आहे. या सर्व घटकांचा एकजुटीने बंध बांधुन आपले व्यक्तिमत्व घडवणे हे आपले कर्तव्य आहे. जरी या परीक्षा जास्त असल्या तरी त्याबरोबर ज्ञान मिळवून आपण आपला विकास करणं महत्त्वाचं आहे नाहीतर या धावपळीचे कुठेच समाधान मिळत नाही.

        ज्ञान हे केवळ पुस्तकी असून इतर व्यवहारी गोष्टींचेही असावे. भावना आणि संस्कृतीही जपणं आज गरजेचं आहे. कारण या परीक्षांमध्ये भारतीय संस्कृती लुप्त होण्याची भीती आहे. जी आपण जपली पाहीजे, तिला लुप्त होऊ देता कामा नये. ज्ञानाबरोबर इतर कलागुणांचा विकास करावा. शिवाय भारतीय संस्कारही जपलेच पाहिजेत. जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतातील समाजाची नैतिकता ढासळत आहे. ती ज्ञानार्थी या जागरूक्तेतूनच सावरली पाहिजे.

        पण आजही आपल्यातला ज्ञानर्थी जागरूक आहे. स्पर्धेचा आणि परीक्षेचा शेंदरी लेप चढलेल्या या स्वयंभू मूर्तीतला ज्ञानार्थी झाकाळला आहे. त्याला फक्त अस्तित्व दाखवून देण्याची संधी हवी आहे. माणूस नेहमी नव्याचा शोध घेऊ पाहतो, पुढे चालत राहतो तेव्हा मर्यादित ज्ञान न घेता पुढेही काहीतरी निर्माण करावे या कल्पनेतूनच परीक्षांचा जन्म होतो. त्यातूनच वादविवादाला वाव मिळतो आणि नवनिर्मिती होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसा विद्यार्थी केवळ ज्ञानार्थी असून उपयोग नाही, तर तो परीक्षार्थीही असला पाहीजे. तरच त्याच्या विद्यार्थीपणाला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर सारंच व्यर्थ आहे. काहीतरी नवं मिळविण्यासाठी परीक्षा द्यावीच लागणार आहे. या परीक्षांना खरे उतरल्यावरच आपल्याला समाधान लाभणार आहे. शेवटी म्हटलंच आहे ना टाकीचे घाव सोसल्या शिवाय, दगडाला देवपण येत नाही...!


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....