मुख्य सामग्रीवर वगळा

सुखाची गुरुकिल्ली

 


श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर


जगी सर्व सुखी असा कोण आहे,

                            विचारी मना तूची शोधूनी पाहे.

या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.

       ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे? सुख म्हणजे नेमकं काय असतं? सुख हे कोठे, केव्हा आणि कसे मिळते? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील, पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.

 आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे मी सुखी होईन. या सारख्या प्रश्नांनी प्रत्येकजण ग्रासलेला आपल्याला पाहायला मिळेल. या जगात कोण सुखी आहे असं जर कोणी विचारलाच तर याचे उत्तर समर्थ रामदास महाराजांच्या मनाच्या श्लोकात दिसते. तुम्हाला कोणीही सांगणार नाही की, मी आणि माझे कुटुंब सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत. असं छातीठोकपणे बहुतेक कोणीही सांगताना दिसणार नाही. मी श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा गर्भश्रीमंत आहे असं म्हणतील परंतु  सुखी, समाधानी, आनंदी आहे असं म्हणायला अजून ही कोणी तयार नाही. याचे कारण काय असेल याचा शोध अजून ही लागलेला नाही.

माझ्याकडे पैसा-अडका, जमीन-जुमला, सत्ता-संपत्ती, धन-दौलत, ऐश्वर्यसंपन्न असे वैभव आहे परंतु मी सुखी किंवा यात समाधानी आहे असं सांगताना दिसत नाही. प्रत्येकजण दुःखाचा पाढा वाचताना दिसतील.मला कुटुंब, मिञ परिवार, नातीगोती, सगेसोयरे सर्व काही आहे परंतु मी सुखी नाही बरेचजण हेच सांगताना दिसतील.परंतु सुखी आणि समाधानी आहे असं कोणीही म्हणायला तयार नाही.प्रत्येक जण म्हणतो की मला सुखी जीवन जगायचे आहे.मग प्रश्न असा पडतो की या सुखासाठी किंवा सुखी जीवनासाठी आपण काय केले पाहिजे? काय केले म्हणजे सुख मिळेल? आपण कधी सुखी होऊ.मला कधी आणि कशात सुखासह समाधान मिळेल. प्रत्येकजण याचाच शोध घेताना तुम्हाला दिसेल.

या सध्याच्या कलियुगात खरच सुख मिळेल की नाही मिळेल तर केव्हा, कूठे, कसे मिळेल याचा शोध चालू आहे. सुख ही काही वस्तू नाही की ती बाजारातून खरेदी करून घेता येईल. सुख हे प्रत्येकाच्या विचारावर आणि स्वतःच्या मानण्यावर अवलंबून आहे.

तुझ आहे तुझ पाशी

परी जागा चुकलाशी

या उक्ती प्रमाणे आपली प्रत्येकाची गत झाली आहे. सुखाच्या शोधात आपण आपला रस्ता चुकलो आहोत हे मात्र नक्की आहे. जसे मृग कस्तुरीच्या शोधात साऱ्या जंगलात भटकते आणि शेवटी दमून भागून तो एके ठिकाणी बसते तेव्हा त्याच्या लक्षात येतो की कस्तुरी तर आपल्या जवळच आहे आणि आपण सारं जंगल फिरलो.सर्व काही व्यर्थ गेले. तशीच आपली  प्रत्येकाची तशीच गत झाल्यासारखी वाटते.

सुख इकडे तिकडे कोठेही नसून ते आपल्या मध्येच आहे. त्याचा फक्त शोध घेता आला पाहिजे. संत वचनाप्रमाणे सुख दुसरं तिसरं काही नसून सुख म्हणजे समाधान. समाधानाच सुखाचे बीज आहे.सुख हे तुमच्या आमच्या मनात दडलेले आहे. सुख हे तुमच्या आमच्या विचारात दडलेले आहे. कोठेही जा, कितीही प्रयत्न करा, काहीही करा जो पर्यंत आपल्या मानतील तृष्णा जात नाही किंवा नष्ट होत नाही तो पर्यंत आपण सुखी होऊच शकत नाही. संत कबीर एके ठिकाणी असे म्हणतात की,

चिटी चावल ले चली

बीच में मिले दाल

कहे कबीर दो ना मिले

इक ले इक डाल.

म्हणजे तुम्ही आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधान मानून  जगायला सुरुवात केली पाहिजे. आपण आहे त्यात समाधानी राहायला शिकल पाहिजे.त्यापेक्षा जास्त कसे आणि कुठे मिळेल याकडे आपला कल आहे. म्हणूनच आपण आज दुःखी असून सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लोभी कुत्रा ही कथा आपण सर्वांनी वाचली आहे, ऐकली आहे, नाहीतर विद्यार्थ्याना शिकवली सुध्दा आहे. त्यातून बोध मात्र घेतला नाही.सुख न मिळण्याचे कारण काय असेल तर ते म्हणजे तृष्णा होय. तृष्णा म्हणजे नक्की काय? तर तृष्णा म्हणजे आपल्या मनातील ईच्छा, हाव, आशा, आकांक्षा आणि अपेक्षा, कामना, भावना आणि वासना त्याच बरोबर आपल्या मनातील लोभ, मोह, माया, मद आणि मत्सर या या पुर्णपणे जाणार नाहीत तो पर्यंत तुम्हा आम्हाला सुख मिळणार नाही. तुम्ही आम्ही सुखी होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आणि वास्तव आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. मग सुखासाठी काय करावं लागेल हा यक्ष प्रत्येकाला पडलेला आहे. त्याचे उत्तर मात्र साधे आणि सोपे आहे.पाहिले म्हणजे तृष्णा विरहित, निरपेक्ष, निस्वार्थी, साधे, सोपे जीवन जगणे आणि दुसरे म्हणजे जे आहे त्यात समाधान, आनंदी जीवन जगणे हीच आहे सुखाची गुरू किल्ली. लोभी कुत्र्याची गोष्ट आपण सर्वजण जाणता. आपली अवस्था ही तेल ही गेले आणि तूप ही गेले हाती धुपाटणे राहिले अशी झाल्यासारखी होईल.

म्हणून तुम्हा आम्हाला जर सुख पाहिजे असेल किंवा सुखी जीवन जगायचं असेल तर तृष्णा विरहित, निस्वार्थी, निरपेक्ष, शांत, समाधानी जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. या समाधानातच  सुखाची बीजे आहेत त्याचा शोध घेऊन आपलं जीवन सुखी आणि समृद्ध केले पाहिजे. समाधान हीच खरी आपल्या सुखाची गुरू किल्ली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मूल्यवर्धन: काळाची गरज

  आपले मत कोणी ऐकले नाही की वाईट वाटते त्याप्रमाणे इतरांनाही मत असतात, त्यांचा आदर करणे, ती जाणून घेणे ह्या भावना मूल्य संस्कारातूनच साध्य होऊ शकतात.   देशाची प्रगती, देशाचा विकास होतो ,त्या देशातील तरुण पिढी मुळे आणि संस्कारक्षम देशही घडला जातो तो या तरुणांमुळे. "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." आपण रोज नित्यनियमाने शाळेतील परिपाठात आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचे कथन, वाचन करतो. आपला एकच हेतू असतो, येणारी नवी पिढी देशाचा विकास करणारी, देशाला प्रगतीपथावर नेणारी अशी निर्माण व्हावी. परंतु एवढ्यावरच थांबून चालेल काय? आज आपल्या भारत देशाला खरी गरज आहे संस्काराची मूल्यांची, मूल्यसंवर्धनाची. आपण समाजात पाहतो गरिब व श्रीमंतातील दरी, स्त्रियांच्या प्रती असणारा वाईट दृष्टिकोन, उपेक्षित, तळागाळातील समाजाची होत असलेली अवहेलना. प्रत्येक व्यक्ती आज मी व माझा एवढा संकुचित विचार करते आहे. परंतु या चाकोरीबद्ध विचाराने आज समाजातून मूल्यांचा ऱ्हास होत झालेला आपणास पाहायला मिळतो. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यालाही मन, भावन...

अश्रू

       असं म्हणतात ' अश्रू ' हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते. असेलही कदाचित. पण.... मानवाच्या भाव - भावनांचा विचार करता ' अश्रू ' या शब्दाला व त्यामागील भावनेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाचं मन सारखं नसतं. कठोर , मृदू , दयाळू , तटस्थ , खंबीर , हळवं... असे अनेक प्रकार.       परमेश्वरानं माणसाच्या झोळीत सुखा बरोबर दुःखाचेही दान टाकले. अन ते दुःख व्यक्त करण्यासाठी अश्रुंची निर्मिती केली असावी. पण त्यातही स्री पुरुष भेदाभेद आढळतो. स्री अश्रुंना पटकन वाट मोकळी करुन देते. जसे आकाशातील काळ्याकुट्ट ढगांना गार हवेचा स्पर्श झाला की पावसाची जशी बरसात होते , अगदी तसे..... पुरुष मात्र पांढऱ्या ढगांसारखे असतात.....   सुख जेव्हा आनंदाच्या अत्युच्य सीमा गाठते. तेव्हाही अश्रुंना आवर घालता येत नाही. आणि अति संवेदनशील प्रसंगी , वाईट घटनांच्या प्रसंगीही आवर घालणे अवघडच.... निसर्गातील मनमोहक दृश्यांनीही आनंदाश्रू तरळतात. उंचावरुन पडणारा नयनरम्य धबधबा , रानफुलांवर बागडणारी ती नाजूकशी रंगबेरंगी फुलपाखरे , वाऱ्याची नाजूकशी झुळूक , पक्ष्यांचा तो किलबिला...

व्यवसाय मार्गदर्शन : मोबाईल टेक्निशियन

     मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन , जोडणी , वितरण , विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने , सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.      आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे....